Manomay

लहान मुलांमधील मलावरोध-(मलावष्टंभ – भाग 3)

लहान मुलांमधील मलावरोध (Constipation in children)

 

आपल्या बाळाच्या ‘शी’ कडे आईचे आणि घरातील मोठ्या माणसांचे बारीक लक्ष असते गरजेचे आहे . दोन प्रकारचे बदल मुख्यत्वेकरून आढळतात.
एक म्हणजे जुलाब आणि दुसरे मलावरोध यापैकी जुलाबामुळे सर्वजण जास्त काळजी करू लागतात. ‘मलावरोध’ मात्र जेव्हा बरेच दिवस असतो किंवा शी च्या जागी जखम झाल्यामुळे जेव्हा त्याला खूप त्रास होतो किंवा बाळ शी च करत नाही , तेव्हा डॉक्टरांकडे दाखवले जाते. ‘मलावरोध’ म्हणजे घट्ट कडक शी होणे आणि ती होताना त्रास होणे. यामध्ये दिवसातून किती वेळा होते याला अजिबात महत्त्व नाही. बऱ्याच वेळा मूल दोन दिवसांतून एकदा शी करते पण ती मऊ असते हा मलावरोध नाही. पुष्कळ लोकांचा आपल्या मुलाने रोज ‘शी’ ही केलीच पाहिजे,ती न झाल्यास त्याच्या प्रकृतीत बिघाड होईल म्हणून त्यासाठी औषध केलेच पाहिजे असा समज असतो. अशा वेळी वैद्यकीय सल्ल्याशिवाय मनानेच मोठ्या माणसांमध्ये वापरण्यात येणारी औषधे, सपोझिटरीज यांचा अयोग्य व विनाकारण वापर होतो. यामुळे मुलाच्या कोठ्यास वाईट सवयी लागतात व कालांतराने अशी वेळ येते की सहज जशी शी मुलाला होईनाशी होते व त्याचेच रूपांतर मलावरोधात होते.

मलावरोधाची नेहमीची कारणे व घरगुती उपचार :-
●बाळ जर अंगावर दूध पीत असेल तर त्यास क्वचितच घट्ट किंवा कडक शी होते. याउलट वरच्या दुधावरची शी नेहमीच जरा घट्ट होते म्हणून अंगावर दूध पिणाऱ्या बाळास जर मलावरोध असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काहीवेळा cretinism- ‘थायरॉईड हार्मोन्स कमी होणे’ किंवा आतड्यांच्या गंभीर रोगाची प्रथम लक्षणे असतात. वेळेवर निदान झाल्यास त्याप्रमाणे उपचार करून बाळास बरे करता येते.
●वरच्या दुधामुळे जर फार घट्ट शी होत असेल तर दुधातील साखरेचे प्रमाण वाढवणे आणि 2 भूकेमध्ये पाणी पाजणे हा साधाच पण गुणकारी उपाय आहे. दूध जर फार घट्ट असेल तर त्यात पाणी घालावे.
साधारणपणे जन्मतः निम्मे दूध निम्मे पाणी देऊन दर महिन्यात पाण्याचे प्रमाण कमी करून ४-५ महिन्यात पूर्ण दूध द्यावे. सहाव्या महिन्यानंतर टोमॅटोचा रस, फळांचा रस, पालक भाजी रस द्यावा म्हणजे बाळास मऊ शी होईल.
हवामानातील उष्णते नुसार मुलांच्या पाण्याच्या गरजा बदलत असतात त्यानुसार त्या भागवल्या नाहीतर शी मध्ये फरक जाणवतो त्याच प्रमाणे आजारपणात- तापात या गरजा खूप वाढलेल्या असतात म्हणून तापात खड्या सारखी शी होते. मुलाला भरपूर द्रव पदार्थ (Liquid diet) देऊन हा त्रास कमी करता येतो.
●सर्दी, खोकला, जुलाब यावरील औषधे डॉ. देतात ती फार जास्त दिवस किंवा प्रमाणाबाहेर देत राहिल्यास शी घट्ट होते व नवीन त्रास सुरू होतो. मुलाला जर मलावरोधाची सवय असेल तर त्याची कल्पना डॉक्टरांना द्यावी. लहान मुलांमधील मलावरोधाचे आणखी एक कारण म्हणजे ‘उपाशी राहणे’ पोटात जर अन्न गेले नाही तर शी होणारच कशी? यासाठी औषधांची गरज नसून आहाराचे योग्य प्रमाणाची गरज आहे. पूर्ण व्यवस्थित आहार सुरू झाल्यावर ही तक्रार दूर होते.
‘शी’ च्या जागी झालेली जखम किंवा ‘फिशर’ हे एक आणखी कारण अतिशय लहान किंवा किरकोळ वाटणारी ही जखम मुलाला फार त्रास देते. पण शी करताना ही जखम फारच दुखते त्यामुळे मुल शी करायचे टाळते आणि शी आणखी कडक होते. अशी कडक शी होताना जखम आणखी तापली जाते व वाढत जाऊन दुखते हे दुष्ट चक्र सुरू राहते , अशावेळी खाण्या-पिण्यात बदल करून द्रवपदार्थाचे प्रमाण वाढवणे तसे जेवणात ‘रफेज’ म्हणजे चोथ्याचे प्रमाण वाढवून अशा गोष्टी म्हणजे – पालेभाज्या, कडधान्यांच्या साली, कोशिंबीर , पिकलेले केळे व सफरचंद.
●जखमेच्या जागी वेदना कमी करण्यासाठी ‘शतधौतघृत’ किंवा साजूक तूप लावणे व ती जागा दिवसातून दोन-तीन वेळा गरम पाण्याने शेकून गरज वाटल्यास मलावरोधावरील औषधोपचार ही घ्यावेत. क्वचित प्रसंगी एखादे वेळी लहान ऑपरेशनही करावे लागते .त्यानंतर आहारातील बदल बद्धकोष्टता होऊ नये यासाठी चालू ठेवावे लागतात.
●साधारणपणे दीड ते 2 वर्षापर्यंतच्या मुल स्वतःहून शी करत नसून ती आपोआप होणारी क्रिया असते त्यानंतर योग्य ती शिकवण, नियम लावून दिले तर मूल वेळेवर शी करेल व मलावरोध टाळता येईल.
एकदा नियमित शी होऊ लागली की प्रत्येकाने तशी थोडीफार वेळेवर अशी करण्याची सवय करून घ्यावी. एखाद्यावेळेस झाली नाही तर अस्वस्थ होऊ नये किंवा लगेच स्वतःच्या मनाने उपचार करू नये. थोडक्यात म्हणजे आहारातील चोथा आणि पाण्याचे किंवा द्रव पदार्थांचे प्रमाण आणि व्यवस्थित शिकवण सवय या आधारे या मुलांमधील नेहमीच्याच पण अवघड प्रश्नावर तुम्ही सहज मात करू शकाल.


मनोमय आयुर्वेद व पंचकर्म सेंटर
www.manomayhealthcare.com
शिवाजी चौकाजवळ, लांडेवाडी, भोसरी, पुणे.
📱7350314444

back-to-top