Manomay

अधोवात ( गॅसेस )

अधोवात ( गॅसेस )

मानवी जीवनात ‘अजीर्ण ‘ किंवा ‘पोटात गॅस धरणे’ हा सर्वांकरताच नेहमीचाच काळजीचा विषय होऊन राहिला आहे.
घरातील वयस्कर मंडळी जेवायला बसली , की ‘ मला बेताने वाढा, आता जास्त खाणे पचत नाही ‘ पोटात गॅस धरतो , असा सावध पवित्रा नेहमीच घेत असतात . अशी मंडळी चारचौघांच्या बैठकीत बसली की काही वेळा त्यांच्या पोटाच्या खालच्या भागात गॅस पकडतो.असा हा मोठ्या आठड्यातला वायू आवाज करून लगेच मोकळा होतो. परंतु काही व्यक्ती हा वायू ,अडवतात व वेगवेगळ्या लहानमोठ्या वात विकारांना जणू आमंत्रणच देतात. जगभर गॅसेस, Indigestion , भूक नसणे, पचन न होणे, अरुची ( तोंडाला चव नसणे ) पोट जास्त फुगणे ,अजीर्ण अशा विविध तक्रारी करिता अब्जावधी रुपयांची नित्य प्रचंड प्रमाणावर औषधे खपत असतात.
अजीर्णावर औषधोपचार घेण्याची वेळ येणे म्हणजे ‘ रोग्याचा आपल्या जिभेवर ताबा नसणे, हे आहे.

चिकित्सा :- काही घरगुती उपचार
● अजीर्ण असल्यास तत्काळ ‘लंघन’ करावे .( काहीही खाऊ नये ) .
●अजीर्ण , गॅसेस वारंवार होत असल्यास तोंडात लगेच आल्याचा (Ginger) तुकडा ठेवावा; व सोसेल इतपत चावून खावा.
कोमट पाण्यात किंचित सुंठ चूर्ण मिसळून ते पाणी प्यावे.
आले रस व लिंबू रस एकत्रित करून घ्यावे.
पाव चमचा ओवा व चिमुटभर सैंधव मीठ एकत्रित करून घ्यावे.
● जेवणात शक्य असल्यास एरंडतेल असावे .
● गॅसेस , अपचन , अजीर्ण दीर्घकाळापासून असल्यास वैद्यांच्या सल्ल्यानुसार प्रकृतीनुरूप शंख वटी, प्रवाळ पंचामृत , आरोग्यवर्धिनी, गंधर्व हरितकी .अशा औषधांचा उत्तम उपयोग होतो.
● जुनाट आजार असल्यास – ‘बस्ती , विरेचन’ अशा पंचकर्माचा वैद्यकीय सल्ल्याने उपचार करावा.
● विषेशदक्षता :- सकाळी किमान व्यायाम , सकाळी – सायंकाळी फिरून येणे, जमल्यास रात्री जेवणानंतर ही फिरणे , भुकेपेक्षा २ घास कमी खाणे , उशिरा झोप व जेवण टाळणे.
पथ्य:- दोडका , पडवळ, घोसाळे, दुधी अशा भाज्या पुदिना – आले – लसूण युक्त चटणी . ज्वारीची भाकरी , मुगाचे वरण.
अपथ्य:- पचनास जड असे – वाटाणा, उडीद, हरभरा, मका, पोहे, बटाटा, कांदा, रताळे यांपासून बनवलेले विविध पदार्थ, जास्त पाणी व इतर थंड पदार्थ.
● या आजारात मुख्यत्वे करून – पोटात साठलेला वायू जवळच्या मार्गाने मोकळा व्हावा आणि पोटात अजिबात अवाजवी वायू साठू नये याकरिता प्रयत्नशील रहावे. ‘संयम से स्वास्थ्य‘ हे शास्त्र वचन, पोटात गॅस धरणाऱ्या खवय्यांनी ( foody ) रुग्णांनी नेहमी लक्षात ठेवावे. वारंवार पोटात गॅस धरत असेल व शरीरात फाजील वजन, चरबी वाढत असेल तर रुग्णाने एकदातरी लिपिड प्रोफाईल- Triglyceride Cholesterol अशा रक्ताच्या चाचण्या करून घ्याव्यात.
● बऱ्याच वेळा मूळ कारण गॅस धरणे हे माहीत असूनही घाबरलेले रुग्ण -छातीत जडपणा,दुखणे असल्याने भयभीत होऊन वारंवार ECG करणे, इतर चाचण्या करणे हे घडत राहते मात्र निदान काहीच होत नाही. अशा वेळी घाबरु नये,
मानसिक स्थिती नीट ठेऊन ‘लंघन’ करावे, अवश्य फायदा होतो.

वै. सुहास शिंदे
मनोमय आयुर्वेद व पंचकर्म सेंटर
www.manomayhealthcare.com
शिवाजी चौकाजवळ, लांडेवाडी, भोसरी, पुणे.
📱7350314444

back-to-top